छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि देशातील सर्व जनतेला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो, असं सांगतानाच सर्व आमदार आणि खासदार यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, असं पत्र लिहून द्यावे, अशी मागणी जर सदाभाऊ खोत यांनी केली असेल तर त्यांची मागणी चांगली आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला पुढच्या महिन्याची डेडलाईन दिली असली तरी जरांगे यांनी गाफील न राहण्याचं ठरवलं आहे. आरक्षणाबाबत दगाफटका झाल्यास काय करायचं याचा मोठा प्लान मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे यांनी दुसरा पर्याय म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्यावर जरांगे यांनी भर दिला आहे. त्यासाठी त्यांनीही मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीचं टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहात का? असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी होय असं उत्तर दिलं. आणि काय प्लान केला त्याची माहितीच जरांगे यांनी दिली. आम्हाला राजकारणाकडे नेऊ नका. माझ्या मराठ्याकडे सरकारला घाम फोडेल एवढी शक्ती आहे. पण काही गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळेच आम्ही विधानसभेसाठी चार टप्प्याची पाहणी पूर्ण केली आहे. पाचव्या टप्प्याची पाहणी करायची होती, पण मी रुग्णालयात भरती झाल्याने पाचव्या टप्प्याची पाहणी होऊ शकली नाही. पण आम्ही पाहणी करतोय हे शंभर टक्के खरे आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सांगितलं.
पाडायचे की निवडून आणायचे?
जनजागृती हा पहिला टप्पा आहे आणि असे आम्ही पाच टप्पे टाकणार आहोत. त्यानंतर आम्ही मराठा समाजाची बैठक घेणार आहोत आणि 288 उमेदवार पडायचे की निवडून आणायचे हे ठरवणार आहोत. एकदा ठरवले की पडायचे तर पडायचे आणि निवडून आणायचे तर निवडून आणायचे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
दगाफटका केला तर कार्यक्रम करू
असं असलं तरी आम्ही 13 जुलैपर्यंत थांबणार आहोत. सरकारच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत. शंभूराज देसाई यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी दगा फटका केला तर त्यांचा कार्यक्रम समजाला करावा लागणार आहे, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
पुन्हा मुंबई गाठणार
सग्यासोयऱ्यांची मागणी सांगितल्याप्रमाणे घेतली नाही तर पुन्हा करोडो मराठा एकत्र येऊ शकतात. आमची मागणी पूर्ण नाही झाली तर पुन्हा मुंबई गाठू. यावेळी फक्त पुरुष नसतील तर महिला या आंदोलनात मोठ्या संख्येने असतील. गावागावातून महिला बाहेर येतील आणि मुंबईत ठाण मांडतील, असंही ते म्हणाले.
सरकारवर ओबीसी नेत्यांचा दबाव
आमच्या मागण्यावर सरकार काहीही काम करत नाही. सरकारने आमच्या आमच्या ज्या नोंदी मिळाल्या त्यांनाही प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. त्यांच्यावर ओबीसीचे नेते दबाव आणत आहेl. त्यामुळे सरकारने व्हॅलिडीटी देणे बंद केले आणि रेकॉर्ड तपासणीही बंद केलं आहे. 100 टक्के काम बंद केले आहे, असा दावा करतानाच 6 जुलै ते 13 जुलै दरम्यान मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र येणार आणि सरकारला जागे करण्याचे काम करणार आहे, असं जरांगे यांनी सांगितलं.