आज दिल्लीत घडणार मोठ्या घडामोडी……….

 केंद्रात कुठल्याही एकापक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आघाडी सरकारचा काळ सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार स्थापनेसाठी दिल्लीत आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीच्या पडद्यामागून जोरदार हालचाली सुरु आहेत.

18 व्या लोकसभेसाठी देशातील जनतेने आपला कौल दिलाय. काल 4 जून रोजी लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी पार पडली. जनतेने कुठल्याही एकापक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. त्यामुळे पुन्हा आघाडी सरकारचा काळ आला आहे. भाजपाप्रणीत एनडीए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 272 या बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा जास्त जागा आहेत. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीकडे 234 जागा आहेत. भाजपाने स्वबळावर 240 जागा जिंकल्या असून काँग्रेसने 99 जागांवर विजय मिळवला आहे. केंद्रात सत्ता स्थापनेत आंध्र प्रदेशच्या तेलगु देसम पार्टी TDP चे चंद्राबाबू नायडू आणि बिहारमधील जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांची मुख्य भूमिका राहणार आहे. दोन्ही नेते किंग मेकर ठरले आहेत. भाजपाच तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच स्वप्न या दोन नेत्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून या दोन्ही नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे.

दरम्यान आज दिल्लीत दोन मोठ्या राजकीय बैठका होणार आहेत. आज इंडिया आघाडीची संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यात विरोधी पक्षात बसायच की, सरकार स्थापनेचा दावा करायचा? याची रणनिती ठरु शकते. इंडिया आघाडीमध्ये जवळपास 20 पक्ष आहेत. या सर्व पक्षांच्या मिळून जितक्या जागा आहेत, त्यापेक्षा जास्त जागा एकट्या भाजपाच्या आहेत. इंडिया आघाडीमधील नेते सरकार आम्हीच बनवणार असं सतत म्हणत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीची आजची बैठक महत्त्वाची असेल

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी महत्त्वाची बैठक.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी आज इंडिया आघाडीची बैठक होईल. बैठकीत पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावर चर्चा होऊ शकते. महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिल्लीत होणाऱ्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीसाठी सगळ्या घटक पक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

मोदींच्या निवासस्थानी बैठक

दुसऱ्याबाजूला NDA ची सुद्धा आज बैठक होणार आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना बैठकीला बोलवलं आहे. आज एनडीएच्या संयोजक पदावर होणार चर्चा. आजच्या बैठकीत शपथविधीवर पण चर्चा होवू शकते. दरम्यान आज सकाळी साडेअकरा वाजता मोदींच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. भाजपमधील वरिष्ठ नेते आणि मंत्री बैठकीला उपस्थित राहणार. आज संध्याकाळी होणाऱ्या NDA च्या बैठकीपूर्वी कॅबिनेट बैठकीत होणार महत्त्वपूर्ण चर्चा

Leave a Comment