शिंदे गटात महाभूकंप?, सहा आमदार ठाकरे गटात येणार? विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठी उलथापालथ

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता महायुतीत चुळबुळ सुरू झाली आहे. शिंदे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. विद्यमान खासदारांच्या सहा जागाही शिंदे गटाला गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार घाबरले आहेत. विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र राहिलं तर आपल्याला पाच वर्ष घरी बसावे लागेल अशी भीती या आमदारांच्या मनात निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच आता महायुतीत चांगलीच चुळबुळ सुरू झाली आहे. शिंदे गट आणि अजितदादा गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. शिंदे गटाला विद्यमान खासदारांच्या जागाही राखता आलेल्या नाहीत. विद्यमान खासदारांपैकी 7 खासदारच निवडून येऊ शकले आहेत. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्यामुळेच शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती आहे. हे सहाही आमदार ठाकरे गटात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात फार मोठ्या उलथापालथी होणार असल्याचं चित्र आहे.

शिवसेना शिंदे गटाचे 6 आमदार शिवसेना ठाकरेंच्या संपर्कात आहेत. हे सर्वच्या सर्व सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सहा आमदारांना प्रवेश दिल्यास शिंदे गटाचे इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात, अशी माहिती आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात या मोठ्या घडामोडी होणार असल्याचंही या नेत्याने सांगितल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार आहे.

अनेक लोक संपर्कात

ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी या घडामोडींवर भाष्य करताना अत्यंत तोलूनमापून प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या संपर्कात सहा आमदार असल्याचा आम्ही दावा केला नाही. अनेक लोक दिवाळीपासून आमच्याशी संपर्क करत आहेत. त्यांच्याशी किती संपर्क ठेवायचा? नाही ठेवायचा हा नंतरचा भाग आहे. आमच्यासाठी तो विषय संपला आहे. आम्ही आमच्याच लोकांना घेऊन विधानसभा लढणार आहोत, असं सचिन अहिर म्हणाले.

भाजपमध्येही अस्वस्थता

शिंदे गटातच नाही, तर अजित पवार गट आणि भाजपमध्येही अस्वस्थता आहे. मुंबईत भाजपचे सहा आमदार मागे पडले आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. तेही विचार करत आहेत. पण आमच्याशी कुणीही संपर्क केलेला नाही. लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांनी संपर्क केला होता. आम्हाला नाही तर आमच्या घरातील माणसांना तिकीट द्या अशी मागणी केली होती. घरातील नाही तर आम्ही सांगू त्या माणसाला तिकीट द्या. आम्ही त्यांना आतून मदत करतो, असं संपर्क करणारे म्हणाले होते. पण आम्ही त्याला नकार दिला होता, असा गौप्यस्फोट सचिन अहिर यांनी केला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाकरे गटाचे 13 खासदार फुटले होते. शिंदे गटाने महायुतीत लोकसभा निवडणुकीत 15 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी फक्त त्यांच्या सात जागा निवडून आल्या. म्हणजे आठ ठिकाणी शिंदे गटाचा पराभव झाला. त्यापैकी विद्यमान सहा खासदारांच्या मतदारसंघातही शिंदे गटाला पराभव स्वीकारावा लागला. भाजपने सर्व्हेच्या नावाखाली शिंदे गटावर मोठा दबाव टाकला होता. त्यामुळे भावना गवळी आणि इतरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट नाकारलं होतं. विधानसभा निवडणुकीतही तसंच होण्याची भीती शिंदेंच्या आमदारांना वाटत आहे. उद्धव ठाकरे हे मास लीडर असून त्यांच्याकडेच खरा शिवसैनिक असल्याची भावनाही या आमदारांची झाली असल्याने या आमदारांनी ठाकरे गटाशी संपर्क सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.

Leave a Comment