लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी आपल्या क्लिपमध्ये शहीद अजय सिंह यांचा उल्लेख केला. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावरही मोठा आरोप केला.
अग्निवीर प्रकरणाबाबत विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने प्रश्न विचारत आहेत. सोमवारी 1 जुलै रोजी लोकसभेत याची जोरदार चर्चा झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भगवान शिवाचा फोटो दाखवून लोकसभेत आपले म्हणणे मांडले. सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना अनेकदा अडवले. यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी भगवान शिवाच्या फोटोसह अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी, संसदेतील माझ्या भाषणात मी म्हटले होते की, सत्याचे रक्षण हा प्रत्येक धर्माचा पाया आहे. याला प्रत्युत्तर म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भगवान शिवाच्या फोटोसमोर नमस्कार केला. संपूर्ण भारत, देशाचे सैन्य आणि अग्निशामकांना नुकसान भरपाईबद्दल खोटे बोलले. असा आरोप केला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये शहीद अजय सिंह यांचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या वडिलांची क्लिप दाखवली आहे. “राजनाथ सिंह यांनी शहीदांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये मिळाले आहेत, असे विधान केले होते. पण, आम्हाला कोणतेही पैसे मिळाले नाहीत. असे ते म्हणत आहेत. यावरून राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर संसदेत खोटे बोलल्याचा आरोप करत माफी मागण्याची मागणी केली.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभागृहामध्ये भगवान शंकराचे चित्र दाखवून सत्य, धैर्य आणि अहिंसा ही भगवान शंकराची प्रेरणा असल्याचे सांगितले. भगवान शिव म्हणतात घाबरू नका असा उल्लेख करत ते म्हणाले होते की, इस्लाम, शीख, ख्रिश्चन अशा सर्व धर्मांमध्ये या मुद्राचा उल्लेख आहे. बौद्ध आणि जैन धर्मात आहेत. भगवान श्रीरामांनी भाजपला संदेश दिला आहे असा संदर्भ देत राहुल गांधी यांनी अयोध्येतील भाजपच्या पराभवाचा उल्लेख केला होता.
राहुल गांधी यांनी शहीद अजय सिंह यांच्या वडिलांचा व्हिडिओ शेअर केला आहे. जर यांच्या मुलाने बलिदान दिले आणि त्यांना पैसे मिळाले नाहीत तर मग राजनाथ सिंग यांनी संसदेत खोटे का सांगितले? हा शहिदांचा आणि देशातील तरुणांचा अपमान आहे. त्याबद्दल त्यांनी तरुणांची माफी मागावी अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.