वसंत मोरेंसोबत मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरेंनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर त्यांच्या पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वसंत मोरेंसह तब्बल २३ पदाधिकाऱ्यांनीही मनसेला रामराम करत शिवबंधन बांधत हातात मशाल घेतली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरेंचे फारच अनोख्या पद्धतीने स्वागत केले.
“तात्याचं शेवटचं स्टेशन मातोश्री”
“खूप दिवसांनी पाऊस झाला आणि वसंतही फुलला. आता आगे बढो नको, ते आहेत तिथेच थांबू द्या. ते खूपच पुढे आले आहेत आणि मातोश्रीपर्यंत पोहोचलेत. मी वसंत तात्यांचे स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसांपासून तात्या लोकसभा लढले. त्यानंतर तात्या पुढे काय करणार, पण तात्याचं शेवटचं स्टेशन हे मातोश्री असणार याची मला खात्री होती”, असे संजय राऊत म्हणाले.
“शिवसेनेची ताकद वाढणार”
“कारण तात्यांची सुरुवात शिवसेनेतून झाली. तात्या हे अधेमध्ये कुठेही गेलेले असले तरी तात्या हे मूळचे शिवसैनिक आहेत आणि आता तो शिवसैनिक मातोश्रीच्या मंदिरात दाखल झालेला आहे. शिवसेना परिवारात ते सहभागी झाले आहेत. तात्या शिवसेनेत आल्याने पुणे, खडकवासला आणि आसपासच्या सर्व परिसरातील शिवसेनेची ताकद वाढणार आहे. उद्धव ठाकरेंना एक चांगला मजबूत असा कार्यकर्ता शिवसैनिक मिळालेला आहे”, असेही संजय राऊतांनी म्हटले.
“आपण सर्वांनी मिळून पुण्यातील शिवसेना अधिक पुढे नेऊया. तात्यांसोबत असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत, अनेक पदाधिकारी आलेत आणि त्या सर्वांना शिवसेनेत सहभागी करुन घेताना आम्हाला आनंद होतोय. आपण सर्व स्वगृही परतलेले आहात, असं मी मानतो”, असेही संजय राऊत म्हणाले.
वसंत मोरेंचा 23 पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
वसंत मोरेंसोबत मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यामुळे पुण्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे.
वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम केला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले होते. शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, ही जागा कॉंग्रेसकडे गेल्याने येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. पण, त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.