मुरलीधर मोहोळ यांना सहकार खाते देण्यामागे भाजपची मोठी खेळी, या दोन नेत्यांचे वर्चस्व मोडण्याचे टार्गेट

मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी विमान उड्डान मंत्रालय देण्यात आले आहे. यामुळे पुणे विमानतळाच्या विकास, पुरंदर येथे होणारे नवीन विमानतळ हा प्रश्न मार्गी लागणार आहे. लोहगाव येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल सुरु झाले तर त्या ठिकाणावरुन वाहतूक सुरु झाली नाही.

मोदी 3.0 मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर सोमवारी रात्री मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले. महाराष्ट्रातून मोदी 3.0 मंत्रिमंडळात सहा जणांचा समावेश आहे. त्यात पीयूष गोयल (वाणिज्य) आणि नितीन गडकरी (रस्ते वाहतूक) या दोघांना कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. राज्यमंत्री असलेले रक्षा खडसे (क्रीडा), प्रतापराव जाधव ( आयुष) रामदास आठवले (सामाजिक न्याय) तर पुणे लोकसभा मतदार संघातील खासदार मुरलीधर मोहोळ यांना सहकार खाते दिले आहे. पुणे महानगरपालिकेतून सरळ संसदेत पोहचलेले मुरलीधर मोहोळ यांना सहकार खाते देण्यामागे भाजपची मोठी खेळी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहऱ्यावर डाव खेळताना भाजपचे लक्ष्य सहकाराकडे असल्याची चर्चा सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर शरद पवार आणि अजित पवार यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांची निवड केल्याची चर्चा रंगली आहे.

अजित पवार, शरद पवार यांना धक्का देणार

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. बारामतीमध्ये त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला. यामुळे भाजप श्रेष्ठी नाराज असल्याची चर्चा आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका, सोसायट्या या सर्वांवर अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यांना धक्का देण्यासाठी आज सहकारमध्ये भाजपची पाळेमुळे मजबूत करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांना सहकार खाते दिले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहरा

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह यांच्याकडे सहकार खात्याची कॅबिनेटची जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री म्हणून काम करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहरा म्हणून मोहोळ यांचे नेतृत्व उदयास आणले जात आहेत. सहकाराच्या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारखे राज्य अख्त्यारीत राहावे यासाठी मोदी 2.0 सरकारमध्ये प्रथमच हे खाते निर्माण केले गेले. पहिल्यांदा या खात्याची जबाबदारी नरेंद्र मोदी यांचे सर्वात विश्वासू सरदार अमित शाह यांना दिली. आता भाजप श्रेष्ठींना मुरलीधर मोहोळ यांना सहकार राज्यमंत्री करत आपले लक्ष्य निश्चित केले आहे.

विमानतळाचा प्रश्न सुटणार?

मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी विमान उड्डान मंत्रालय देण्यात आले आहे. यामुळे पुणे विमानतळाच्या विकास, पुरंदर येथे होणारे नवीन विमानतळ हा प्रश्न मार्गी लागणार आहे. लोहगाव येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल सुरु झाले तर त्या ठिकाणावरुन वाहतूक सुरु झाली नाही. यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

Leave a Comment