बारामतीमधील उमेदवार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस, काय कारण आहे …

 बारामती मतदार संघातील सर्व ३८ उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशील बुधवारी तपासण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी २८ एप्रिलपर्यंतचा खर्च २९ लाख ९३ हजार ३१ रुपये सादर केला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी २८ एप्रिलपर्यंत ३७ लाख २३ हजार ६१० रुपये खर्च केले आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष बारामती मतदार संघाकडे लागले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरात सुरु केला आहे. या दरम्यान दोन्ही उमेदवारांच्या अडचणी वाढवणारा प्रकार घडला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आयोगने नोटीस बजावली आहे. खर्च कमी दाखवला असून खर्चात तफावत आढळून आल्याने ही नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना दोन दिवसांत खुलासा करण्याचे सांगितले आहे.

४८ तासांत खुलासा करावा

निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावली आहे. सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या तपासणीत निवडणूक खर्चात ९ लाख १० हजाराची तफावत आढळून आली आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या खर्चात १ लाख ३ हजार रुपयाची तफावत आढळली आहे. यामुळे दोन्ही उमेदवारांनी ४८ तासांत खुलासा करावा, अन्यथा उमेदवारांच्या खर्चात तफावत समाविष्ट केली जाईल, असे नोटीसीत म्हटले आहे.

आक्षेप असल्यास दाद मागा

नोटीसवर आक्षेप असल्यास जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार उमेदवारांना आहे. बारामती मतदार संघातील सर्व ३८ उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशील बुधवारी तपासण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी २८ एप्रिलपर्यंतचा खर्च २९ लाख ९३ हजार ३१ रुपये सादर केला आहे. या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केल्यानंतर त्यात ९ लाख १० हजार ९०१ रुपयांची तफावत आढळली. त्यामुळे ही नोटीस देण्यात आली.

सुप्रिया सुळे यांनी २८ एप्रिलपर्यंत ३७ लाख २३ हजार ६१० रुपये खर्च केले आहे. या खर्चाची तुलना शॅडो रजिस्टरशी केल्यानंतर त्यात १ लाख ३ हजार ४४९ रुपयांची तफावत आढळली. दोन्ही उमेदवारांना या नोटीसचे उत्तर ४८ तासांत द्यावे लागणार आहे.

Leave a Comment