घडामोडींना वेग… काँग्रेसही सत्ता स्थापनेचा दावा करणार, फॉर्म्युला तयार; नाना पटोले यांचा दावा काय?

अशोक चव्हाण यांना जनतेनं नेता बनवलं होतं. ते भाजपात गेले पण जनता गेली नाही. त्यामुळे नांदेडमध्येही आम्हाला मोठं यश मिळालं. नांदेड हा काँग्रेसचा जिल्हा होता, आहे आणि राहणार आहे. मराठवाड्यात रावसाहेब दानवे हे अमरपट्टा घेऊन आल्यासारखे वागत होते. त्यांना आमच्या कल्याण काळे यांनी जागा दाखवली आहे, असं सांगतानाच विलासराव देशमुख हे माझे गुरू आहेत. त्यांनीच मला यशाचा कानमंत्र सांगितलेला आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

आम्ही देशातील सर्वात मोठा पक्ष आहोत. आम्हीही सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार आहे. आमच्याकडे सर्व फॉर्म्युले तयार आहेत. सगळे खासदारांना दिल्लीत बोलावलं आहे. आज खासदार दिल्लीत येणार असून सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्लीत सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस खरोखरच सरकार बनवण्यासाठी हालचाली करणार आहे काय? असा सवाल केला जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील सर्व खासदारांशी संपर्क झाला आहे. मी उद्या दिल्लीत जाणार आहे. खासदारांना दिल्लीत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीत आम्ही सरकार बनवणार आहोत. आम्ही प्लान तयार केला आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

लहान भावासारखं वागा

महाविकास आघाडीत काँग्रेस काल मोठा भाऊ होता. आजही मोठा भाऊ आहे. उद्याच्या विधानसभेतही मोठा भाऊ असेल. जागा वाटपातही काँग्रेस मोठा भाऊ होता. कालपर्यंत आमच्यासोबत गट होते. आता पक्ष होतील, असा टोला नाना पटोले यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लगावला. आम्ही मोठे भाऊ आहोत. लहान भावाने लहान भावासारखंच वागावं, असा चिमटाही त्यांनी काढला.

भावा भावात भांडणं झाली की भाऊबंदकी संपते. त्यामुळे महाविकास आघाडीने लहान भावाने लहान भावासारखं वागलं पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच विशाल पाटील हे राहुल गांधी यांच्यासोबत असणार आहेत. तसे त्यांनी स्पष्ट केलं आहे, असं नाना पटोले म्हणाले.

विदर्भातील 50 जागा जिंकणार

आज माझा वाढदिवस आहे. राज्यातील जनतेचे आभार व्यक्त करतो. आम्हाला विजय मिळवून मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यात दुष्काळ आहे. दुष्काळाचं चित्र भयावह आहे. या सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं आहे. विदर्भ हा काँग्रेसचा गड होता. नंतर तो भाजपकडे गेला. आता परत आमच्याकडे आला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही विदर्भातील 62 पैकी 50 जागा जिंकणार आहोत, असा दावा त्यांनी केला आहे.

Leave a Comment