अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार केला. दोन जणांनी तीन राऊंड गोळीबार केला असून याप्रकरणी क्राइम ब्रांच तपास करत आहे.
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास दोन अज्ञातांनी गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर मुंबई पोलिसांची क्राइम ब्रांच घटनास्थळी ताबडतोब पोहोचली आणि त्यांनी तपास सुरू केला. गोळीबाराच्या घटनेनंतर सलमानच्या घराबाहेरची दृश्ये सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी प्रतिक्रिया दिली. सलमान खान असो किंवा कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती, मुंबई आणि महाराष्ट्रात सध्या कोणालाच सुरक्षित वाटत नाहीये, असं ते म्हणाले.
“मुंबईत नुकताच गोळीबार झाला होता आणि डोंबिवलीतही आमदारावर गोळीबार झाल्याची घटना घडली. आज सकाळी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला. कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे? गृहमंत्री, मुख्यमंत्री.. तुम्ही कुठे आहात? गुन्हेगार बेधडकपणे रस्त्यावर फिरत आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घ्यावी”, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
“आज पहाटे 5 वाजता दोन अज्ञातांनी सलमान खानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर ओपन फायरिंग केली. तीन राऊंड फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. क्राइम ब्रांच घटनास्थळी पोहोचली असून तपास सुरू आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळी फॉरेन्सिक टीमसुद्धा पोहोचली आहे. आरोपींची ओळख पटण्यासाठी आम्ही या परिसरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहोत”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
गुरुवारी ईदनिमित्त सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांनी घराच्या गॅलरीमध्ये येऊन चाहत्यांना अभिवादन केलं. दरवर्षी रमजान ईदनिमित्त सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्याच्या घरासमोर गर्दी करतात. यंदाही सलमानला भेटण्यासाठी चाहत्यांनी वांद्रे इथल्या त्याच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटसमोर गर्दी केली होती. सलमानच्या घरासमोर जमलेल्या या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अखेर ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.