शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मोदी-शाह जोडगोळीवर टीकास्त्र डागण्यात आले आहे. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी-शहा यांची दमछाक झाली. मोदी यांचा तोरा उतरला. मोदी यापुढे हिंदुत्वाचा ‘हि’सुद्धा तोंडातून काढू शकणार नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल लागले असून भाजपप्रणित एनडीए हे सरकार स्थापन करणार आहेत. उद्या ( 9 जून) संध्याकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मात्र असे असले तरी भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली नसून एनडीएतील इतर पक्षांच्या मदतीने हे सरकार चालणार आहे. याचाच दाखला देत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मोदी-शाह जोडगोळीवर टीकास्त्र डागण्यात आले आहे. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी-शहा यांची दमछाक झाली. मोदी यांचा तोरा उतरला. मोदी यापुढे हिंदुत्वाचा ‘हि’सुद्धा तोंडातून काढू शकणार नाहीत, अशी टीका अग्रलेखात करण्यात आली आहे. सत्तेसाठी मोदी यांनी आधी पक्षफोडी केली, आता तडजोडी केल्या. कारण ‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ झाला व मोदींचा तोरा कुबड्यांवर लटकला आहे, असा टोला लगावण्यात आला आहे.
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात ?
मोदी आणि शहा यांच्यावर टीका करणारा सामनाचा अग्रलेख , जसाच्या तसा…
नऊ राज्यांतून भाजप हद्दपार
नरेंद्र मोदी 2014 साली प्रथम सत्तेवर आले तेव्हा ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नारा त्यांनी दिला. 2024 साली त्याच काँग्रेसने मोदींच्या गर्वाने फुगलेल्या छातीचा फुगा फोडला आहे. काँग्रेसने मुसंडी मारून भाजपच्या बहुमताचे मुंडके उडवले. किमान नऊ राज्यांतून भाजप हद्दपार झाला. भाजपला तेथे खाते उघडता आले नाही. तामीळनाडूसारख्या मोठय़ा राज्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. पंजाब हे महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यातही भाजप खाते उघडू शकला नाही. मेघालय, मणिपूर, नागालॅण्ड, सिक्कीम अशा सीमावर्ती राज्यांत भाजपची कामगिरी शून्य आहे. पुद्दुचेरी, चंदिगढमध्येही भाजप उरलेला नाही. (अर्थात मध्य प्रदेशसह बारा राज्यांत काँग्रेसची हीच दयनीय अवस्था आहे.) उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काँग्रेस व समाजवादी पार्टीने मिळून भाजपला ‘अर्ध्या’ राज्यातून साफ केले.
काळाने सूड उगवला
महाराष्ट्रातील भाजपवर तर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आणली. देशातील हे गणित पाहिले तर ‘काँग्रेसमुक्त भारत’ या नारेबाजीची साफ शकले उडाली आहेत. मोदी-शहांच्या गुजरातमध्ये काँग्रेसने खाते उघडले व अनेक मतदारसंघांत काँग्रेस उमेदवारांनी भाजप उमेदवारांना घाम फोडला. काँग्रेसचे योगदान मानायला मोदी तयार नव्हते. स्वातंत्र्यलढय़ात, देशाच्या प्रगतीत काँग्रेस कोठेच नाही असे मोदीकृत नव भाजपचे म्हणणे होते, पण या वेळी काँग्रेसने शंभर जागांचा टप्पा पार करून मोदी यांचा तर्क खोटा पाडला. मोदी यांच्याप्रमाणेच भाजपचे अध्यक्ष डॉ. नड्डा यांनीही असे जाहीर केले होते की, यापुढे देशात फक्त भाजपच राहील व प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व आम्ही नष्ट करू, पण त्यांच्यावर काळाने कसा सूड घेतला ते पहा. भाजपने बहुमत गमावले व नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान वगैरे प्रादेशिक पक्षांच्या कुबडय़ा घेऊनच मोदी यांना कडबोळे किंवा खिचडी सरकार बनवावे लागले. मोदी हे संघ प्रचारकाचे कार्य करीत असताना ‘खिचडी’ त्यांना प्रिय होती, असे ते भाषणात सांगतात. आता त्यांना काही काळ खिचडीच खावी लागणार आहे.
मोदी टॉनिक कमजोर निघाले
लोकसभा निकालाआधी नड्डा यांनी आरोळी ठोकळी होती की, ‘‘आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही. आता आम्ही मोदी टॉनिक मारून स्वयंभू व बलवान झालो आहोत.’’ मात्र निकाल असे लागले की, मोदी टॉनिक कमजोर निघाले व भाजपला संघाच्या पायरीवर याचक म्हणून उभे राहावे लागले. मोदी व शहांनी जे जे अनैसर्गिक कृत्य केले ते त्यांच्यावर उलटले. गेल्या काही दिवसांपासून मोदी-शहा हे उसने अवसान आणून दंडबैठका ठोकीत आहेत, पण त्यांच्या काळवंडलेल्या चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसतोय. मोदी हे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेसला संपवायला निघाले होते, पण मोदींना ते जमले नाही व हे पक्ष अधिक मजबुतीने उभारी घेऊन पुढे आले.
शरद पवार हे भटकती आत्मा व उद्धव ठाकरे नकली संतान असल्याची भाषा मोदी यांनी प्रचारात वापरली, पण त्याच भटकत्या आत्म्याने व नकली संतानाने महाराष्ट्रातून भाजपचे ‘पिंड’ कावळय़ासह उडवून लावले व बहुमत गमावलेला मोदींचा आत्मा प्रादेशिक पक्षांच्या पिंपळावर लटकलेला दिसत आहे. चिराग पासवान यांचा ‘लोजपा’ अमित शहांनी फोडला व चिराग यांच्या काकांच्या हाती दिला. चिन्ह व पक्षही गमावून चिराग उभे राहिले. आज त्याच चिराग यांच्या टेकूवर मोदी सत्ता स्थापन करीत आहेत. मोदी यांचे धोरण हे असे आहे. उद्या ते काँगेस पक्षाचेही गुणगान सुरू करतील व सत्ता टिकविण्यासाठी गरज पडली तर सोनिया गांधींच्या दारात उभे राहतील.
मोदी हे शंभर टक्के व्यापारी आहेत व व्यापारी फक्त स्वतःचा फायदा बघतो. अमित शहा यांनी आंध्रात जाऊन तेलुगू देसमला संपविण्याची भाषा केली होती. चंद्राबाबूंना कधीच ‘एनडीए’मध्ये घेणार नाही, असेही सांगितले होते. नितीश कुमार यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न अमित शहा करीत असल्याचा आरोप स्वतः नितीशबाबूंनीच केला होता. आज सत्तेसाठी त्याच नितीश कुमारांचे चरणतीर्थ मोदी-शहांना प्राशन करावे लागले. काँगेस सत्तेवर आली तर मुसलमानांना आरक्षण देईल, असा बागुलबुवा मोदी यांनी प्रचारात उभा केला, पण चंद्राबाबू हे स्वतः मुसलमान समुदायास आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत व तशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे मोदी यांनी चंद्राबाबूंची मागणी मान्य केली काय? असा प्रश्न पडतो.
मोदींचा तोरा उतरला
सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी-शहा यांची दमछाक झाली. मोदी यांचा तोरा उतरला. मोदी यापुढे हिंदुत्वाचा ‘हि’सुद्धा तोंडातून काढू शकणार नाहीत. मोदी यांनी जे ठरवले तसे काहीच झाले नाही. कारण मोदी यांचे बोलणे व डोलणे सर्वच खोटे होते. त्यांचे तप, ध्यान हे ढोंग होते. सत्तेसाठी मोदी यांनी आधी पक्षफोडी केली, आता तडजोडी केल्या. कारण ‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ झाला व मोदींचा तोरा कुबडय़ांवर लटकला आहे. ‘इंडिया’ने ‘बहुमतमुक्त भाजप’ हे सत्य कृतीत आणले. तरीही मोदी यांना म्हणे जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत असा दावा त्यांचे लोक करतात. हे आश्चर्यच आहे!