T20 वर्ल्ड कप 2024 विजयानंतर टीम इंडिया मायदेशी कधी परतणार? याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष लागलं आहे. टीम इंडिया मायदेशी आल्यानंतर नियोजन कसं असणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढणार का? BCCI टीमला कसं सन्मानित करणार? असे अनेक प्रश्न आहेत.
प्रत्येक भारतीय फॅन टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाची आतुरतेने प्रतिक्षा करत होता. अखेर शनिवारी संध्याकाळी ही प्रतिक्षा संपली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसी T20 वर्ल्ड कप 2024 चा किताब जिंकून इतिहास रचला. प्रत्येक भारतीय आज या विजयाच्या आनंदात आहे. आता फक्त एका गोष्टीची प्रतिक्षा आहे, ही प्रतिक्षा अजून लांबणार आहे. वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसह टीम इंडिया मायदेशी कधी परतणार? याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. ही प्रतिक्षा अजून थोडी लांबू शकते. ब्रिजटाऊनच्या बार्बाडोसमध्ये 29 जूनला फायनल सामना खेळला गेला. या मॅचमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून वर्ल्ड कप जिंकला.
17 वर्षानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा T20 चॅम्पियन बनली आहे. 11 वर्षानंतर कुठली आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाच्या या यशाच प्रत्येक खेळाडूने सेलिब्रेशन केलं. या वर्ल्ड कप विजयाने संपूर्ण देशात एक उत्साह, जोश संचारला आहे. आता फक्त टीम इंडियाच्या मायदेशी परतण्याची प्रतिक्षा आहे. बार्बाडोसमध्ये येणाऱ्या वादळामुळे ही प्रतिक्षा आणखी लांबू शकते.
म्हणून प्लान रद्द करावा लागला
रिपोर्ट्नुसार, काही तासात हरिकेन बेरिल वादळ बार्बाडोसला धडकणार आहे. याच वादळामुळे ब्रिजटाऊनसह बार्बाडोसमध्ये सर्व एअरपोर्ट सध्या बंद आहेत. सर्व उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळेच टीम इंडियाला रविवारी ब्रिजटाऊनवरुन न्यू यॉर्कला जाण्याचा प्लान रद्द करावा लागला. टीम इंडिया, सपोर्ट स्टाफ, बीसीसीआय अधिकारी आणि खेळाडूंच कुटुंब असं मिळून 70 सदस्य एमिरेट्स एयरलाइन्सच्या विमानाने न्यू यॉर्कला जाणार होते. तिथून दुबई मार्गे टीम इंडिया नवी दिल्लीला पोहोचणार होती.
बीसीसीआयने काय बदल केला?
हरिकेन वादळामुळे टीम इंडियाला मायदेशी परतण्यास विलंब लागणार आहे. बीसीसीआयने प्लानमध्ये सुद्धा बदल केलाय. पीटीआय रिपोर्ट्नुसार, एका खास चार्टर फ्लाइट 70 जणांना ब्रिजटाऊनवरुन थेट नवीन दिल्लीला घेऊन येणार आहे. कुठल्याही परदेश दौऱ्यावरुन परतताना टीम इंडिया सर्वात आधी मुंबईत येते. पण यावेळी नवी दिल्लीला जाण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींची संभाव्य भेट हे एक कारण असू शकतं. 2011 मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीसह संपूर्ण टीमने नवी दिल्लीत तत्कालीन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेतली होती.