कधीच सापडली नसती खूनी पत्नी, तीन वर्षानंतर एका मेसेजने बिघडला सगळा खेळ……………………………

तुम्ही केलेलं पाप हे कधीच लपत नाही असं म्हटलं जातं. ते या प्रकरणावरुन सत्य असल्याचं समोर आलं आहे. कारण तीन वर्षानंतर पतीची हत्या केल्याचं अखेर पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. तिला वाटलं की, आता तिने केलेली हे षडयंत्र कोणालाच कळाले नाही. पण ती अखेर पोलिसांच्या जाळ्यात फसली.

देशात अनैतिक संबंधातून अनेक अशा घटना समोर येत असतात ज्यामुळे समाजातील लोकं किती खालच्या स्तरापर्यंत जाऊ शकतात याची जाणीव होते. अशी एक घटन हरियाणातील पानिपतमध्ये घडली आहे. तीन वर्षापूर्वी एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हे हत्या प्रकरणात पत्नीचा समावेश असल्याची गोष्टी तीन वर्षानंतर समोर आली. एका व्हॉट्सॲप मेसेजमुळे आणि पोलीस अधिकाऱ्याच्या करडी नजरेमुळे या हत्येमागील रहस्य उलगडले. या हत्येमागे दुसरी कोणी नसून मयत व्यावसायिकाची पत्नीच असल्याचं समोर आलं आहे. जिने आपल्या प्रियकरासह पतीच्या हत्येचा संपूर्ण कट रचला होता,

2021 मध्ये विनोदची हत्या

15 डिसेंबर 2021 रोजी विनोद भरारा यांची त्याच्याच घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. देव सुनार असं हत्या करणाऱ्याचं नाव आहे. तो एक ट्रक चालक होता. याआधीही त्याने आपल्या ट्रकने विनोद भरारा यांना मारण्याचा प्रयत्न केला होता ज्यात विनोद गंभीर जखमी झाला होता. अटक झाल्यानंतर देव सुनार याने पोलिसांना सांगितले होते की, ट्रक अपघात प्रकरणात कोर्टाबाहेर तोडगा काढण्यास नकार दिल्याने त्याने विनोदचा गोळ्या घालून खून केला. या प्रकरणात तो तुरुंगात होता आणि केस रखडली होती. मात्र तरी देखील खुनाचा उलगडा झाला.

पोलिसांना आला व्हॉट्सॲप मेसेज

एके दिवशी जिल्हा पोलीस प्रमुख आणि आयपीएस अधिकारी अजितसिंह शेखावत यांच्या फोनवर एक व्हॉट्सॲप मेसेज आला. ज्यामध्ये या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची विनंती करण्यात आली होती. विनोद भरारा यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीनेच हा हत्येचा कट रचल्याचा संशय संदेश पाठवणाऱ्याने व्यक्त केला होता. हा मेसेज दुसरा कोणी नाही तर ऑस्ट्रेलियात राहणारा विनोदचा भाऊ प्रमोद याने पाठवल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा फाईल बाहेर काढली आणि काहीतरी गडबड असल्याचा संशय आला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, “जेव्हा मी या प्रकरणाचा अभ्यास केला तेव्हा मला आश्चर्य वाटले. अपघात प्रकरण निकाली काढण्यास नकार दिल्याने कोणीही एखाद्या व्यक्तीला का मारेल? गाडीची धडक लागल्यास अशा प्रकरणांमध्ये मोठा दंड आकारला जात नाही आणि आरोपींना अनेकदा जामीन मिळतो, परंतु खुनाच्या प्रकरणांमध्ये शिक्षा अधिक कठोर असते. त्यामुळे एखादा व्यक्ती ही गोष्ट का करेल.’

जिम ट्रेनरशी जवळचे संबंध

गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा केस तपासली. त्यानंतर या प्रकरणाचा नव्याने तपास सुरु झाला. पोलिसांना तपासात असे कळाले की ड्रायव्हर देव सुनार हा जिम ट्रेनर सुमितच्या जवळचा होता. जो विनोद भरारा यांची पत्नी निधीला देखील ओळखत होता. पोलिसांनी संशयितांवर नजर ठेवून चौकशी केली. त्यानंतर हळूहळू हे प्रकरण समोर येऊ लागले.

विनोद भरारा यांची पत्नी निधी भरारा आणि सुमीत यांची जीममध्ये भेट झाली होती. दोघांमध्ये नंतर जवळीक वाढली आणि त्यांचे अफेअर सुरू झाले. विनोद याला या गोष्टीची भनक झागली आणि त्याने पत्नीला देखील याबाबत विचारणा केली. यानंतर घरात वारंवार वाद होऊ लागले. विनोदचा जिम ट्रेनर सुमितशीही देखील वाद झाला. त्याला त्याने आपल्या पत्नीपासून दूर राहण्याचा इशारा दिला. पण निधी आणि सुमितच्या मनात काही तरी वेगळंच सुरु होतं. दोघांनी विनोदच्या हत्येचा कट रचला आणि त्याला संपवलं.

10 लाख रुपयांची ऑफऱ

जिम ट्रेनर सुमितची चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले की, या कामासाठी त्याने पंजाबमधील ट्रकचालक देव सुनार याच्याशी संपर्क साधला होता. यासाठी ट्रक चालकाला 10 लाख रुपये रोख दिले होते. त्यानंतर पिकअप व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आणि 5 जानेवारी 2021 रोजी देव सुनार यांनी या वाहनाने विनोदच्या कारला धडक दिली. पण यामध्ये विनोद गंभीर जखमी झाला. मात्र तो बचावला. त्यामुळे निधी आणि सुमितने प्लॅन बी तयार केला.

देव सोनार याने विनोदच्या घरी जाऊन अपघात प्रकरण निकाली काढण्यास सांगितले. त्यावेळी त्याने नकार दिला आणि देव सुनार याने त्याच्यावर गोळी झाडली. विनोदच्या हत्येनंतर काही दिवसांनी सुमित आणि निधी मनालीला गेल्याचेही तपासात समोर आले आहे. निधीने आपल्या मुलांना ऑस्ट्रेलियात त्यांच्या काकांकडे राहण्यासाठी पाठवले होते.

पोलिसांना जेव्हा या प्रकरणात संशय आला तेव्हा दोघांची चौकशी केली गेली. दोघांनीही गुन्हा कबूल केला. देव सुनार यांचा सर्व खर्च हे दोघेच करत असल्याचं देखील समोर आलं. निधीला पती विनोद यांच्या निधनानंतर विमा कंपनीकडून पैसे मिळाले होते. त्यापैशातूनच ती हा खर्च करत होती. निधी आणि सुमित यांनी हत्येचा कट रचल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. आता दोघेही तुरुंगात आहेत.

Leave a Comment