राज्यातील कोकण, रायगड, रत्नागिरी, मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागांत ९ ते ११ जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सूनची महाराष्ट्रात दमदार आगेकूच सुरु आहे. कोकणानंतर राज्यातील इतर भागांत मान्सून दाखल झाला आहे.
पुणे, मुंबई शहरात मुसळधार पाऊस झाला आहे. पुण्यात पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरले आहे. पुढील तीन दिवस राज्यात अनेक भागांत पाऊस पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून नागरिकांना उन्हाचे चटके आणि असह्य उकाडा सहन करावा लागत होता मात्र पावसाच्या आगमनामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील बहुतांशी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई अन् पुण्यात जोरदार पाऊस झाला. उत्तर मुंबईतील इतर अनेक भागात रविवारी पहाटे ४:०० वाजता पावसाला सुरुवात झाली. मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात पाऊस सुरू आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात बत्तीगुल तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे.
पुण्यात तिघे अडकले, रेस्क्यू करुन सुटका
पुण्यात शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर ओटा याठिकाणी झाडपडून एका व्यक्तीच्या मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाकडे आज पहाटेपर्यंत शहराच्या विविध भागातील झापटपट्टीत एकूण 55 ठिकाणी पाणी शिरले आहे. तसेच 22 आणि भिंत पडल्या. पुण्यात एकूण 79 घटनांची नोंद झाली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री लोहगाव, कलवड वस्ती येथून पाण्यात अडकलेल्या 3 व्यक्तींची सुखरुप सुटका केली आहे.
पुण्यात दुकांनामध्येही पाणी घुसले
पुण्यात शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरात विविध भागात पाणी साचले आहे. पुणे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात अजूनही पाणी साचलेले आहे. भुयारी मार्गात असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे दुकानातील सामानाचे नुकसान झाले. दुकानातील पाणी काढण्याचे काम सुरू आहे. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला.
राज्यातील अनेक भागांत पाऊस
वाशिम तालुक्यातील अनेक गावांत जोरदार मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून पूर्व पाऊस बरसल्याने शेती मशागतीच्या कामाला वेग येणार आहे. अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी पडलेल्या पावसाने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. हा पाऊस अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी कोसळला. सोसाट्याचा वारा आणि विजांचा प्रचंड कडकडाट झाला. धाराशिव जिल्ह्यात मान्सून दाखल झाला. वादळी वारे व पाऊस सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.
अजित पवारांकडून प्रशासनाला सूचना
पुणे शहर आणि परिसरात शनिवारी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. तरी प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
सोलापूरमध्ये जोरदार पाऊस
सोलापूर शहरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटींग झाली. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते झाले जलमय झाले तर सखल भागात पाणी शिरले. मृग नक्षत्राच्या पावसामुळे उकड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना मात्र मिळाला दिलासा. सलग चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे चाळीशी पार जाणाऱ्या तापमानात ही घट झाली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज ही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.