पाकव्याप्त काश्मीरप्रकरणात पाकिस्तानचे सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. पीओके हा पाकिस्तानचा भाग नसल्याचा कबुलीनामा सरकारी वकिलांनी इस्लामाबाद हायकोर्टात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण…
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मान्य केले होते की पाकिस्तानने 1999 मध्ये भारताशी केलेला करार तोडला आहे. आता पाकिस्तानने कब्जा केलेल्या काश्मीरबाबत, पीओकेविषयी पाकिस्तान सरकारच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.पीओकेमध्ये सध्या पाकिस्तानविरोधी नारेच दिल्या जात नाहीत तर मोठे आंदोलन पण छेडण्यात आले आहे. पाकिस्तानी लष्कर, पोलीस आणि नागरिकांमध्ये धुमश्चक्री उडालेली आहे. त्यातच पीओकेतील कवी आणि पत्रकार अहमद फरहद शाह हे दोन आठवड्यांपासून गायब आहेत. याप्रकरणात इस्लामाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सुनावणीवेळी ‘पीओके पाकिस्तानचा भाग नाही’, असा कबुलीनामा सरकारी पक्षाने हायकोर्टात दिला. अर्थात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पीओकेत सध्या पाकिस्तानविरोधी राग आळवण्यात आलेला आहे. येथील नामधारी सरकार आणि पाकिस्तानविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. त्यातच पीओकेतील लोकप्रिय कवी अहमद फरहाद हे गेल्या दोन आठवड्यापासून गायब आहेत. पोओकेतील आंदोलकांच्या मते, पाकिस्तान पोलिसांनी त्यांना तुरुंगात डांबले आहे. तर काहींच्या मते, ते भूमिगत झाले असतील. याप्रकरणी इस्लामाबाद हायकोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकिलांनी, ‘ अहमद फरहाद यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांना पाकिस्तान सरकार अटक करु शकत नाही, कारण पीओके हा आपला भूभाग नाही तर दुसऱ्या देशाचा भाग आहे.’ असा युक्तीवाद केला. सरकारी वकिलांच्या या युक्तीवादावर हायकोर्ट पण हैराण झाले. पीओके जर दुसऱ्या देशाचा भाग आहे, तर मग तिथे पाकिस्तान रेंजर्स काय करत आहेत, असा सवाल हायकोर्टाने विचारल्यावर सरकारी पक्ष गोंधळला.
पाकिस्तानी पत्रकाराने सुनावले खडे बोल
पाकिस्तानेच पत्रकार हामिद मीर यांनी सरकारच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली. ‘सरकारी वकिलांचा युक्तीवाद पीओकेच्या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. जर स्वतंत्र काश्मीर आमचा नाही तर मग तिथे पाकिस्तानी लष्कर काय करत आहे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सध्याचं सरकार पीओकेबाबत नकारात्मक दिसून येत आहे. त्यांनी तिथल्या एका कवीचे अपहरण केले आहे. ते पण पीओकेतूनच, पण हायकोर्टात मात्र पीओके पाकिस्तानचा भाग नसल्याचा दावा करण्यात येत आहे. याचा अर्थ पीओकेवर ताबा मिळविणारे सैन्य पाकिस्तानचे आहे. पण पाकिस्तानच्या अधिकारक्षेत्रात पीओके नाही, असा होतो, असे मीर म्हणाले..
कोण आहेत कवी अहमद फरहाद
पीओकेत सध्या पाकिस्तानबाबत रोष आहे. कवी अहमद फरहाद हे विद्रोही शायर म्हणून लोकप्रिय आहेत. पाकिस्तानी लष्कर, पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या घरातून त्यांचे अपहरण करण्यात आले. बुधवारी ऍटर्नी जनरल मन्सूर उस्मान अवान यांनी फरहाद यांना अटक करण्यात आली आणि ते सध्या पीओके पोलिसांच्या ताब्यात असल्याचे म्हणणे इस्लामाबाद हायकोर्टासमोर सादर केले.