पुणे हिट अँड रन प्रकरणी अखेर शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात शिवानी यांचा किती हात आहे? त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले? याबाबतचे आर्थिक व्यवहार कुणी केले? याची माहिती पोलीस शिवानी यांच्याकडून घेणार आहेत.
पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणात आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता संपूर्ण अग्रवाल कुटुंबच तुरुंगात गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे. आधी नातू, नंतर वडील, आजोबा आणि आता आई सर्वच पोलिसांच्या ताब्यात आहेत. एकाच कुटुंबातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही पुण्यातील कदाचित पहिलीच वेळ असेल. या प्रकरणी शिवानी अग्रवाल यांची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईला गुन्हे शाखेचा पथकाने सकाळी वडगाव शेरीतील राहत्या घरातून अटक केली. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिच्यावर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा ठपका आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने शिवानी अग्रवाल हिला अटक केल्यानंतर प्राथमिक चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या युनिट 4च्या कार्यालयात आणलं होतं. यानंतर बाल न्याय मंडळाच्या परवानगीनुसार गुन्ह शाखेचे पथक शिवानी अग्रवाल हिला घेऊन बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या चौकशीसाठी जाणार आहे. रक्त नमुने बदली प्रकरणात अल्पवयीन आरोपीची गुन्हे शाखेचे अधिकारी चौकशी करणार आहेत.
समोरासमोर चौकशी
पोलीस बालसुधारगृहात शिवानी आणि अल्पवयीन आरोपीला समोरा समोर बसवणार आहेत. यावेळी दोघा मायलेकांची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. अपघात होण्यापूर्वी आणि त्यानंतर काय काय घडलं? या गुन्ह्यात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे? शिवानी यांचा काय रोल आहे? याची माहिती घेतली जाणार आहे. पोलिसांना या प्रकरणात काही महत्त्वाची माहितीही मिळाली आहे. त्याबाबतही शिवानी यांना विचारणा केली जाणार आहे. तसेच शिवानी यांनी कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला त्याची माहितीही घेतली जाणार आहे. ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणाची माहितीही शिवानी यांच्याकडून घेतली जाणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
डॉक्टरांचीही चौकशी होणार
दरम्यान, रक्ताचे नमुने बदलण्याबाबतची माहिती शिवानी यांच्याकडून घेतल्यानंतर अटकेत असलेल्या डॉक्टरांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणात फक्त दोन डॉक्टर आणि वॉर्ड बॉयच आहेत की आणखी कोणी आहे याची माहितीही घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.