Prataprao Pawar: राजकारणात येण्यासाठी अनुकूल परिस्थिती असतानाही वेगळं काहीतरी करण्याची जिद्द मनाशी बाळगत बिजनेसमध्ये शिक्षण घेऊन मोठं साम्राज्य उभं करणाऱ्या प्रतापराव पवारांनी ‘सकाळ’ च्या ‘आमच्या काळी’ या पॉडकास्टमध्ये आपल्या प्रवासाविषयी सांगितले
Prataprao Pawar: राजकारणात येण्यासाठी अनुकूल परिस्थिती असतानाही वेगळं काहीतरी करण्याची जिद्द मनाशी बाळगत बिजनेसमध्ये शिक्षण घेऊन मोठं साम्राज्य उभं करणाऱ्या प्रतापराव पवारांनी ‘सकाळ’ च्या ‘आमच्या काळी’ या पॉडकास्टमध्ये आपल्या प्रवासाविषयी सांगितले. त्यांचा व्यवसाय करण्याचा निर्णय, बिट्स पिलानीमध्ये जाऊन शिक्षण घेणं, त्यावेळी बिजनेस उभारण्यासाठी लागणारी मेहनत येणाऱ्या अडचणी, कुटूंबाचा प्रतिसाद, बारामतीत उभारला बिल गेट्स फाऊंडेशन सोबतचा AI Based Project इथंपासून ते त्यांच्या आत्ताच्या फिटनेसबाबत त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं.
‘आमच्या काळी’ या पॉडकास्टमध्ये बोलताना प्रतापराव पवारांनी AI च्या आधारावर शेतीवर केलेल्या प्रयोगाबाबत बोलताना बारामतीत बिल गेट्स फाऊंडेशन सोबतचा AI Based Project कसा उभा राहिला. त्याचे काय फायदे आहेत याबाबातची माहिती दिली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये डॉ. जावकरांची ओळख झाली. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयामध्ये जागतिक तज्ज्ञ आहेत. त्यांना वर्षातून एकदा व्हाईट हाऊसमध्ये बोलावलं जातं. प्रतापराव पवारांचा प्रयत्न होता की त्यांना एकदा COEP येथे बोलवावं. मात्र, त्यांना शेतीत जास्त आवड आहे, आणि त्यांना त्यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था, चांगलं मनुष्यबळ, चांगले स्त्रोत, अनुभव, डाटा असणारी संस्था हवी आहे, असं डॉ. जावकरांनी प्रतापराव पवारांना सांगितलं. तेव्हा प्रतापराव म्हणाले, माझ्या गावात अशा एक संस्था आहे.
त्यानंतर त्यांना फोनवरून सर्व माहिती दिली, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉ. जावकर म्हणाले आम्हाला शिकवाल का? त्यानंतर प्रतापराव पवार जावकरांना बारामतीला घेऊन गेले. त्यानंतर जावकर म्हणाले आपण ऑक्सफर्ड युनिव्हरसिटीसोबत ग्लोबल अॅग्रीमेंट सही करुया.
अशातच बिल गेट्स यांच्या फाऊंडेशनचे म्हणणे होते की, जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय शेतीकरता वापरला गेला पाहिजे. तेव्हा बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने वॉशिंग्टनमध्ये शेतीसंबधी एक सेंटर काढलं होतं. त्यानंतर त्यांना जेव्हा कळलं की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने बारामतीशी शेती संबधित अॅग्रीमेंट केलं आहे तेव्हा त्यांनी एक माणूस पाठवला. त्यांनी भेट घेतली चर्चा केली आणि सांगितलं की, वॉशिंग्टननंतर शेतीसंबधीचं जगातील दुसरं सेंटर बारामती असेल. त्यांनी आपलं सेंटर दिलं. त्यानंतर आम्ही अनेक गोष्टींवर रिसर्च करू शकलो, असं प्रतापराव बोलताना म्हणाले.
मायक्रोसॉफ्ट कंपनी, बिल गेट्स फाऊंडेशनचे लोक, बारामतीचे लोक यांनी मिळून गेली २ ते ३ वर्षे यासंबधी रिसर्च केले. त्यातून जे तंत्रज्ञान यशस्वी झालं आहे, गेल्या महिन्यात त्याचं उद्धाटन झालं, त्यामुळे एका एकरामागे निदान ४० टक्के शेतीचे उत्पन्न वाढेल, १५ ते २० टक्के खर्च कमी होईल, शेती पिके मजबूत असतील, शेती पिकं सेंद्रीय असतील त्यामुळे त्यांना युरोपियन मार्केट खुलं होईल.