टीम इंडिया 15 तासांच्या प्रवासानंतर भारतात दाखल झाली आहे. टीम इंडियाचं नवी दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया मायदेशी पोहचली आहे. टीम इंडियाचे खेळाडू हे नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. टीम इंडियाने बारबाडोस ते नवी दिल्ली हा 15 तासांचा प्रवास केला. टीम इंडियासाठी बीसीसीआयने प्रायव्हेट जेट पाठवला होता. या जेटने भारतीय संघ भारताच्या दिशेने रवाना झाला. टीम इंडिया विमानतळावर कधी पोहचतेय, याची क्रिकेट चाहते मध्यरात्रीपासून वाट पाहत होते, अखेर टीम इंडिया विमानतळावर पोहचली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर आता टीम इंडिया विमानतळावरुन हॉटेलच्या दिशेने रवाना झाली आहे. हॉटेलमध्ये टीम इंडियांच स्वागत केलं जाणार आहे. हॉटेलमधून तयार होऊन टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जाणार आहे.
विमानतळावरुन थेट हॉटेलला रवाना
टीम इंडियाला बारबाडोसहून घेऊन आलेलं खासगी जेट पहाटे भारतात आलं.त्यानंतर भारतीय खेळाडू व्हीआयपी गेटने विमानतळावर पोहचले. टर्मिनल 3 वर असलेल्या बसमध्ये एकएक करुन सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ चढले. त्यानंतर बस निघाली. काही सेकंदात बस विमानतळावरील त्या ठिकाणी पोहचली जिथे क्रिकेट चाहत्यांनी गर्दी केली होती. असंख्य क्रिकेट चाहते पोस्टर्स घेऊन टीम इंडियाच्या स्वागतासाठी हजर होते. “इंडिया इंडिया”, अशा जयघोषात टीम इंडियाच्या खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं आहे. बसमध्ये असलेल्या खेळाडूंनी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे आभार मानले.
टीम इंडिया विमानतळावरुन आयटीसी मोर्या या हॉटेलमध्ये जाणार आहे. या हॉटेलमध्ये टीम इंडियाचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू या हॉटेलमध्ये तयार होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहे. त्यामुळे आता दिवसभर साऱ्यांचंच लक्ष हे टीम इंडियाकडेच असणार आहे.
टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारे खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.