भारतीय रेल्वेने आता अमृत भारत योजने अंतर्गत सर्वसामान्य प्रवाशांसाठी साधे नॉन एसी कोच बांधण्याची योजना आखली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.
वाढत्या वंदेभारत एक्सप्रेसमुळे सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास महागडा होत असल्याने रेल्वे आता पुन्हा नॉन एसी डब्यांची निर्मिती वाढण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचे जीवन सुसह्य करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढील दोन आर्थिक वर्षात सुमारे 10,000 नॉन-एसी डबे तयार करण्याची योजना आखली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये सुमारे 10,000 डब्यांची बांधणी केली जात आहे, ज्यात 5,300 हून अधिक जनरल डब्यांचा समावेश असणार आहे.
2024-25 या आर्थिक वर्षात, रेल्वेने अमृत भारत जनरल कोचसह 2,605 जनरल कोच, अमृत भारत स्लीपर कोचसह 1470 नॉन एसी स्लीपर, अमृत भारत एसएलआर कोचसह 323 एसएलआर कोच, 32 उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन आणि 55 पॅण्ट्री कार तयार करण्याची योजना आखली आहे. भारतीय रेल्वेने अलिकडे वंदेभारत एक्सप्रेसची संख्या वाढविली आहे. देशभरात 100 हून अधिक वंदेभारत ट्रेन सुरु आहेत. परंतू साध्या कोचची मागणी वाढली आहे. वंदेभारत महागडी ट्रेन असल्याने साध्या डब्यांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे आता रेल्वेने साध्या डब्यांची बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘अमृत भारत’ योजनेंतर्गत जनरल डब्यांची बांधणी
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये, रेल्वेने ‘अमृत भारत’ जनरल कोचसह 2710 सामान्य डबे, ‘अमृत भारत’ स्लीपर कोचसह 1910 नॉन एसी स्लीपर, ‘अमृत भारत’ एसएलआर कोचसह 514 एसएलआर कोच, 200 उच्च क्षमतेच्या पार्सल व्हॅन आणि 110 पॅण्ट्री कार बनवण्याची योजना आखली आहे . रेल्वे सेवेची मागणी ही एक गतिमान प्रक्रिया आहे आणि ती हंगामी बदल, प्रवासी वाहतूक इत्यादींवर अवलंबून वाढते किंवा कमी होत असते. रेल्वे डब्यांची आवश्यकता या विविध घटकांवर अवलंबून आहे आणि वार्षिक कोच उत्पादन कार्यक्रमात तिचा समावेश केला आहे. कोचचे उत्पादन सामान्यतः मागणीनुसार केले जाते.