भारत आणि मालदीव या दोन देशांमधील संबंध बिघडले असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालदीवमध्ये स्थानिक लोकं आणि भारतीय नागरिकांमध्ये हाणामारी झाली आहे. ज्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. मालदीव पोलीस या प्रकरणाची पुढील कारवाई करत आहे..
मालदीवचे रहिवासी आणि भारतीय नागरिक यांच्यात झालेल्या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर एका स्थानिक रहिवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रसारमाध्यमांनी मंगळवारी ही बातमी दिली. Adhaadhoo.com या न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, मालेपासून सात किलोमीटर ईशान्येस असलेल्या हुलहुमाले येथील सेंट्रल पार्कमध्ये सोमवारी रात्री 9:00 च्या सुमारास दोन गटांमध्ये हाणामारी झाली.
एक संशयित ताब्यात
न्यूज पोर्टलने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ताब्यात घेतलेला संशयित मालदीवचा आहे, परंतु जखमी कोण आहेत याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, गंभीर जखमी झालेल्या दोघांना हुलहुमाले रुग्णालयात दाखव करण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. पोलिसांनी सांगितले की उद्यानात मालदीव आणि भारतीय यांच्या गटामध्ये संघर्ष झाला आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दोन्ही देशांमध्ये तणाव
मालदीवमध्ये भारतीयांसोबतची ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. मालदीवचे मुइज्जू सरकार चीनच्या तालावर नाचत असून एकापाठोपाठ एक भारतविरोधी पावले उचलत आहेत. मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू यांनी भारतीय जवानांना परत पाठवले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयानंतर त्यांचे मनोबल आणखी वाढले आहे. मुइज्जू सरकार चिनी कंपन्यांना अतिशय वेगाने प्रकल्प देत आहे. त्याचवेळी भारतीय पर्यटकांनी मालदीवला टाळल्याने तेथील पर्यटन उद्योग अडचणीत आला आहे.
चीन समर्थक सरकार
भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध सध्या ताणले गेले आहेत. चीन समर्थक पक्ष सत्तेत आल्याने ते भारताशी पंगा घेत आहे. मोहम्मद मुईज्जू हे चीन दौरा करुन आल्यानंतर त्यांची भारतविरोधी भूमिका आणखी तीव्र झाली आहे. मालदीवला तरीही भारताने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु ठेवला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर हा वाद सुरु झालाय. मालदीवचे प्रमुख भारतविरोधी घोषणा देऊनच सत्तेत आले आहेत. मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध त्यामुळे बिघडले आहेत.