भयानक, घरातून खेचून बाहेर आणलं, अख्ख्या गावासमोर पुरुष-महिलेला जिवंत जाळलं, महाराष्ट्रातली घटना……

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील हा प्रकार सगळ्यांना हादरवून सोडणारा आहे. आरोपींनी पीडितांना घरातून खेचून बाहेर आणलं. तीन तास मारहाण केली. त्यानंतर जिवंत जाळलं. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह गावातील एका नाल्यात टाकले.

महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील हा प्रकार सगळ्यांना हादरवून सोडणारा आहे. काळ्या जादूच्या संशयातून गावकऱ्यांनी एका पुरुष आणि महिलेला जिवंत जाळलं. दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 12 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. ही भयानक घटना गडचिरोली जिल्ह्यातील एट्टापल्ली तालुक्यातील बसेरवाडा गावात घडली. पोलिसांना गुरुवारी या बद्दल समजलं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 15 आरोपींना अटक केली.

आरोपींनी देउ अतलामी (57) आणि जमनी तेलामी (52) यांना घरातून खेचून बाहेर आणलं. तीन तास त्यांना मारहाण केली. ते दोघेही दयेची भीख मागत होते. पण कोणाला त्यांची दया आली नाही. संपूर्ण गाव तमाशा बघत होतं. त्यानंतर आरोपींनी त्या दोघांना जिवंत जाळलं. त्यांचा अत्यंत वेदनादायी अंत झाला. जिल्हा पोलिसातील एका अधिकाऱ्याने पीटीआयला ही माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपींनी दोघांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह गावातील एका नाल्यात टाकले. पोलिसांना दुसऱ्यादिवशी या धक्कादायक घटनेबद्दल समजलं.

काळी जादू म्हणजे नेमकं काय झालेलं?

पोलीस अधिकाऱ्याने गुन्ह्याच्या कारणांमागचा खुलासा केला. शेजारच्या बोलेपल्लीमध्ये एकापाठोपाठ एक तीन मृत्यू झाले होते. यामध्ये आरोपींना देउ अतलामी आणि जमनी तेलामी यांनी काळी जादू केल्याचा संशय होता. त्या तीन मृत्यूंसाठी आरोपींनी देउ अतलामी आणि जमनी तेलामी यांना जबाबदार धरलं. तेलामीचा नवरा आणि मुलगा सुद्धा या हत्येमध्ये सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

आरोपी कोर्टासमोर हजर

या प्रकरणात पोलिसांनी कलम 302, 307, 201, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. फरार आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींना अहेरीच्या प्रथम श्रेणी कोर्टासमोर हजर करण्यात आलं. सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Comment