पुण्यात एका डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाली होती. हे पुण्यातील झिकाचे पहिले प्रकरण होते. त्यानंतर आता पुण्यात झिका विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 6 पर्यंत पोहोचली आहे.
पुण्यात गेल्या आठवडाभरापासून झिका विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे शहरात आतापर्यंत सहा जणांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. यात दोन गर्भवती महिलांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. एरंडवणे परिसरातील एका 28 वर्षीय गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात झिका विषाणूने थैमान घातले आहे. पुण्यात एका डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाली होती. हे पुण्यातील झिकाचे पहिले प्रकरण होते. त्यानंतर आता आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडवणे येथील तीन गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी दोन महिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे पुण्यात झिका विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 6 पर्यंत पोहोचली आहे.
आतापर्यंत दोन गरोदर महिलांना झिका विषाणूची लागण झाली आहे. सध्या या दोन्हीही महिलांची प्रकृती स्थिर आहे. यानतंर आता एरंडवणे भागातील आणखी तीन जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अद्याप याचे रिपोर्ट समोर आलेले नाही.
गर्भवती महिलांना जास्त प्रमाणात धोका
पुण्यात झिका विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकड़ून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग हा सर्व रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण आणि फवारणी यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच गर्भवती महिलांना या विषाणूचा जास्त प्रमाणात धोका संभवतो. गर्भवती महिलांच्या गर्भावर या विषाणूचा परिणाम होऊ शकतो. यामुळे बाळाच्या डोक्यात जन्मजात दोष किंवा इतर समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
झिका म्हणजे काय?
झिका हा एक विषाणू असून तो डासांपासून पसरतो. 1947 मध्ये युगांडाच्या झिका जंगलात तो प्रथम आढळला होता. 2015 मध्ये अमेरिकेत, विशेषतः ब्राझीलमध्ये लक्षणीय उद्रेक झाल्यानंतर या विषाणूने जागतिक पातळीवर सर्वांचे लक्ष वेधले. हा उद्रेक मायक्रोसेफली (Microcephaly) या आजारासह जन्मलेल्या बाळांच्या वाढीशी संबंधित होता. मायक्रोसेफली हा एक गंभीर जन्मदोष आहे; ज्यामध्ये लहान मुलाचे डोके असामान्यपणे लहान असते आणि मेंदू अविकसित असतो. त्यावरून हे सिद्ध झाले, “गर्भवती महिलांना या विषाणूचा जास्त धोका असतो आणि त्यांच्या बाळावरही त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.”
झिका विषाणू पसरविणारे डास घरामध्ये आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी आढळू शकतात. जरी हे डास सहसा दिवसाच्या वेळी चावत असले तरी रात्रीच्या वेळीही ते चावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.