आगीपासून वाचवण्यासाठी त्यांनी चक्क रेल्वेच ढकलली, अनेक प्रवाशांचे जीव वाचले

स्टेशनवरील आणि ट्रेनमधील लोकांनी मिळून त्या डब्ब्यांना जोराने ढकलण्याचा प्रयत्न केला. हळू हळू लोकांनी जोर लावायला सुरवात केली आणि काही वेळातच रेल्वे पटरीवर धावू लागली. लोकांनी एकजूट दाखवून ट्रेनला ढकलून सुरक्षित स्थळी नेले.

बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील किउल जंक्शन रेल्वे स्थानकावर एक अनोखी घटना घडली. आगीपासून रेल्वेचे डबे वाचवण्यासाठी लोकांनी एकजूट दाखवून संपूर्ण ट्रेनला धक्का मारत ती आग लागलेल्या डब्यापासून दुर नेली. लोकांच्या या एकजूटतेमुळे रेल्वेच्या अनेक बोगी आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून बचावल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिहारमधील लोकांच्या धैर्याचे आणि एकतेचे लोक कौतुक करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणाहून जसिडीहच्या दिशेने जाणारी मेमू पॅसेंजर ट्रेन किउल स्थानकावर थांबली होती. मात्र, अचानक पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. पहाता पहाता इंजिनला लागून असलेल्या दोन डब्यांना आगीने वेधले. हे दोन्ही डब्बे जळून खाक झाले. या आगीमुळे त्या डब्ब्यातील प्रवाशी घाबरले.

आगीची घटना कळताच स्टेशनवरील उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने इंजिन आणि आग लागलेल्या दोन डब्बे इतर बोगीपासून वेगळे केले. मात्र, आगीची तीव्रता अधिक होती. पसरलेली आग इतर डब्यांना लागू नये यासाठी लोकांनी वेगळे केलेल्या डब्ब्यांना दुर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्टेशनवरील आणि ट्रेनमधील लोकांनी मिळून त्या डब्ब्यांना जोराने ढकलण्याचा प्रयत्न केला. हळू हळू लोकांनी जोर लावायला सुरवात केली आणि काही वेळातच रेल्वे पटरीवर धावू लागली. लोकांनी एकजूट दाखवून ट्रेनला ढकलून सुरक्षित स्थळी नेले.

लोकांचे हे प्रयत्न सुरु असतानाच आग लागलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाचे पथक पोहोचले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वे तज्ज्ञांचे पथक त्याचा तपास करत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोशल मीडियावर ट्रेनला धक्का देतानाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Leave a Comment