अनेक एक्सप्रेस रद्द, लाईफलाईन कोलमडली; मुंबईच्या रेल्वेची सद्यस्थिती काय?

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या विविध ठिकाणी अडकून पडल्याचे दिसत आहेत.

मुंबईत काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील कुर्ला आणि विद्याविहारदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. तर दुसरीकडे हार्बर रेल्वेही विस्कळीत झाली आहे. मुंबईतील पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला आहे.

मुंबईतील लोकलची स्थिती काय?

मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत सुरु आहेत. चर्चगेट ते विरार या मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. तर हार्बर मार्गावरील गोरेगावपर्यंत जाणाऱ्या लोकल माहिम ते गोरेगावपर्यंत सुरु आहे.

तर मध्य रेल्वेवरील सायन, कुर्ला, भांडूप, चुनाभट्टी, विक्रोळी, दादर या ठिकाणी असलेल्या रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे डाऊन आणि अप मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. सीएसएमटी ते ठाण्यापर्यंतची लोकल वाहतूक विशिष्ट वेगाने सुरु आहे.

तसेच हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशीपासून सीएसएमटीला जाणारी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पनवेल ते वाशी मार्ग सुरु आहे. मुंबईला जाण्यासाठी अनेक प्रवाशी हे मिळेल ते वाहन पकडून रस्त्यावर उभे असल्याचे दिसत आहे. नवी मुंबई परिवहनच्या बसने मुंबईत जाण्यासाठी बस स्टॅापवरही रांगच रांग लागल्याचे दिसत आहे.

पुण्याहून मुंबईला येणाऱ्या 3 एक्सप्रेस रद्द

मुंबई उपनगरात मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यासोबतच सीएसएमटीवरुन पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबई उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे.

तसेच कोल्हापूरहून मुंबईला येणारी एक्सप्रेस अंबरनाथमध्ये अडीच तासापासून रखडल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत रेल्वेसेवा बंद असल्यानं अंबरनाथमध्ये एक्सप्रेस उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. अनेक प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर उतरुन रिक्षा किंवा मिळेल त्या वाहनाने घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

लांब पल्ल्याच्या गाड्या अडकल्या

त्यासोबतच मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या विविध ठिकाणी अडकून पडल्याचे दिसत आहेत. यातील काही एक्सप्रेस गाड्या या कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ या स्थानकादरम्यान अडकून पडल्या आहेत. जोपर्यंत फास्ट ट्रॅक सुरु होत नाही, तोपर्यंत या गाड्या सुरु होण्याची शक्यता दिसत नाही.

Leave a Comment